Tuesday, 13 December 2016

नजर (सूफी)



भान हरपले भाव गुंतले नजरी नजर ही भिडताना
मी तू पण ते संपून गेले नजरी नजर ही खिळताना

तुझ्या कटाक्षी संमोहूनी मन खोल बुडाले तरताना
तुझ्या कटाक्षी मोहुनी तरले भवसागरी या बुडताना
तार छेडली दिडदा दिडदा ह्रदया ह्रदयी जुळताना
मी तू पण ते संपून गेले नजरी नजर ही खिळताना

भृंगापरी मी मधुरस प्यावा कमलदली या खुलताना
भृंगापरी हो बंदिवान मी कमलदली या मिटताना
क्षणोक्षणी हे असे घडावे दृष्टा दृष्टी मिळताना
मी तू पण ते संपून गेले नजरी नजर ही खिळताना

स्वप्न लोचनी रोज पहावे फुलताना अन विरताना
सत्य होऊनी उभे ठाकता मीच विरावे फुलताना
कुणी पाहिले कुणा पाहिले असे प्रश्न मग नुरताना
मी तू पण ते संपून गेले नजरी नजर ही खिळताना

तूच दिसावे जळीस्थळी मज जगताना अन मरताना
जगणे मरणे संपून जावे ध्यान तुझे मग स्मरताना
तुझी भावना मनात माझ्या शब्द रूपाने ठसताना
मी तू पण ते संपून गेले नजरी नजर ही खिळताना



Saturday, 22 October 2016

नमी आखें


खलती नही है तेरी कमी
फिर क्यूँ है आखें नमी ... नमी

क्या है इशारा .... ये कैसे मै जानू
मन मे तूही तू है .... मै क्यूँ ये मानू
अब ना मै करता हूँ .... दिल की गुलामी
फिर क्यूँ है आखें नमी ... नमी

दिलका वो हिस्सा.... मैनै है छाना
रोका है यादो में .... तेरा उभरना
वो सब किया जो लगा लाजमी
फिर क्यूँ है आखें नमी ... नमी



Monday, 3 October 2016

जीव जालाय पिसाट


तुज्या रुपाच चांदण,
माज्या मनाच कांडण,
अन रिदयी गोंदण
ठसलय ग, ठसलय ग, ठसलय ग

जीव जालाय पिसाट,
भर ज्वानीच्या रसात,
पिसा भन्नाट सुसाट
सुटलाय ग, सुटलाय ग, सुटलाय ग

माज्या मनाचा जाला पाचोळा
जीव जालाय चोळामोळा
प्राण नजरेत जालाय गोळा
तुज्या नादाने बनलाय खुळा

जीव जालाय पिसाट,
भर ज्वानीच्या .......

तू ग नजरेनं मारलीया गोळी
अग शिकार दिलाची जाली
तूज्या नजरेनं फेकलीया जाळी
त्यात दिलाची गावली मासोळी

जीव जालाय पिसाट,
भर ज्वानीच्या .......


Monday, 26 September 2016

अधुरे गीत



अजून आहे गीत अधुरे ऐकवू तुजला कसे
शब्द अधुरे बोल अधुरे प्रीतही अधुरी असे

रे सख्या या मंद रात्री शेज ही सोडी उसासे
गर्द हिरव्या बांबू बनी या शीळ उसवून विरतसे

बहरल्या गात्रास स्पर्शे हिमलहर मग आतुनी
चेतलेली यज्ञवेदी अर्ध यज्ञी विझतसे

निजवलेल्या लोचनांनी स्वप्न दिधले सजवूनी
अर्धरात्रि अर्धनिद्री स्वप्न नयनी थिजतसे

हर घडी हर पावली अतृप्ती सखया छळतसे
त्या नशील्या भावनांना शब्दी मी बांधू कसे

गूढ गर्भी सावल्यांचा जीवघेणा खेळ चाले
भास की आभास, पक्षी फेर हा घालीतसे

कान वाजे चाहुली, पाऊल दिसे? नुसते ठसे?
कृष्ण रात्री कृष्ण नेत्री कृष्ण कृष्ण दिसतसे


Monday, 5 September 2016

तुजा माजा पिरेम


पिरेमाच्या वाटमंदी सदाच असतय काटं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

म्हाईत हाय मला .. तुजा बी जडलाय जीव
पन मनात तू ठरू दिना, आपल्या पिरेमाची नीव
पुरं जाला नखरा .. नग आढेवेढे घेऊ
दिऊन टाक होकार अन म्हन "आय लव यू"
उगड व्हट , मग बघ कसं मन आनंदानं न्हातं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

व्हय .. माजी कमाई हुते 20 तारकंला फस्त
तुजा पगार बी हाय .. माज्यापेक्षा जास्त
पन पैसा बगून पिरेम न्हाई .. येव्हार व्हतो
जीव मात्र पैक्यावर न्हाई .. मानसावर जडतो
तुला बी ठाव हाय .. हे कारन येकदम खोटं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

आयला, तुजा आतला आवाज .. लई तरास दितो
खरच का ग सारका तुला 'लांब र्‍हा' म्हंतो
नजर तुजी लई द्वाड .. खरं खरं सांगते
नजरानजर व्हताच .. तुज गुपीत उलगडते
बगताना मला ... तुज लवंत न्हाई पातं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

मानलं आपल्या वयात बी लय अंतर हाय
पन पिरमामधी वय बिय बगायचच नाय
मन लय वंगाळ सारक वढाय वढाय
लोकलज्जेखातर लागलं कुढाय कुढाय
गावगप्पा करायला तेंच काय जातं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

मी काय देकणा नाय .. रूप माज डावं
पर तू बी नाय रूपवान .. तुलाबी हाय ठावं
आई-बा ची नापसंती .. कारन येकदम बंडल
तुजा पक्का इचार बग .. तेन्ला बी बदलंल
व्हय म्हन .. मग बग समदं ग्वाड ग्वाड व्हतं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

पिरेमाच्या वाटमंदी सदाच असतय काटं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं


Monday, 29 August 2016

ती बोलताना



ती बोलताना .. अन् मी ऐकताना
ते अधरद्वय पाहुन ... ना शब्द उतरले श्रवणी
त्या अधरद्वयी मोहुन ... काहूर उसळले मनी

खिळली दृष्टी .. हरपले भान
निःशब्द कान .. फक्त .. मौनाचे ध्यान

ती बोलताना .. ओठांच्या डुलणार्‍या पाकळ्या
माझी संमोहित नजर .. हेलकावणारा मनझुला
हिंदकळणार्‍या ह्रदयात .. गोड नाजूक कळा

फुलपंखी फडफड ओठांची
हळूच मिटावी
दोन बोटांच्या चिमटीने

की टिपावी मऊशार साय
अलगद एकाच बोटाने

व्हावे भ्रमर अन् कैद .. त्या कमल द्विदली
अन जावे निजून .. त्या अधर- मलमली

लाल गुलाबी ओठांची वक्र कमान
थेंबावे हलकेच त्यावर ..
जणू दवबिंदू विराजमान
मिटताच ओठ दुमडून ...
हलकेच उतरावे जिवणीवर
अन घसरून आत
मिसळून रक्तात
शिरावे ह्रदयात ..
पुन्हा पुन्हा ..
पुन्हा पुन्हा ..

ती बोलताना ... ती बोलताना ... ती बोलताना



Saturday, 27 August 2016

While on way to Pune ...



अस्त "मी" .. अस्त "मी" .. अस्त "मी"
कण कण विरून ............ नष्ट "मी"

खोल दरी ..
उतरलेले ढग ..
मधेच डोकावणारा ..
डोंगराचा सुळका ..

गर्द हिरवी झाडी ..
उड्या मारत खाली धावणारी ..
पाण्याची रेषा ..
दूर डोंगरावरून कोसळणारा ..
जलप्रपात ..

पावसापासून वाचण्यासाठी ..
एकमेकांना गच्च मिठी मारलेली झाडे ..
एखाद्या झाडाला सर्दी होऊ नये म्हणून ..
वेलीने त्यावर मायेने अंथरलेली चादर ..
कुठे दोन वेली घाबरून ..
एकमेकींना घट्ट बिलगलेल्या ..

काळेकुट्ट खडक ..
जणू मस्तवाल राकट भिल्ल ..
मधेमधे हिरवे गवत ..
केसाळ छाती प्रमाणे ..
मधेच रूक्षपणे बाहेर आलेली ..
एखाद्या वृक्षाची मुळे ..
जणू गच्च भरघोस मिशा ..

हिरवाई पसरलेली .. गवत बनून
मधेच वर आलेला शेताचा बांध ..
तोही हिरवा ..
अत्रिमीती आकाराच्या बांधामधे ..
टरारून उभी हिरवी शेते ..
वीतभर उंचीचे हिरवे कोंब ..
बांधात साचलेल्या घोटाभर पाण्यात ..
खळखळून हसतायत ... खेळतायत ..

दूर डोंगरावर ..
वेढून ढगांचा पुंजका ..
सुळक्याला झाकून टाकणारा ..
जणू शेकोटी नुकतीच विझवलीय ..
आणि धूर पसरलाय .. दाट .. दाट ..

वाटतय ...
शरीराचा कण आणि कण ..
विरळ झालाय .. आणि ..
या सार्‍याचाच एक भाग बनून ...
विरून गेलाय ..

अस्त "मी" .. अस्त "मी" .. अस्त "मी"
कण कण विरून ............ नष्ट "मी"



Thursday, 25 August 2016

मुरलीचा स्वर


कधी  .....
....... दरवळणारा गंधात
....... मुरणारा श्वासात
....... मनमंजिरा छेडणारा
....... पिसागत तरंगणारा

कधी  .....
....... धुसर अधुरा
....... मंद अन् गहिरा
....... धुक्यात लुप्त
....... तेजाने लिप्त

कधी  .....
....... उग्र रुद्र गर्जना
....... शांतिप्रिय अर्चना
....... आण मिलनाची
....... तान विरहाची

कधी  .....
.......  रुसवा फुगवा
.......  खट्याळ फसवा
.......  रसरसते चैतन्य
.......  भारलेले कारुण्य

कधी  .....
....... सूक्ष्म आर्त
....... भरून गात्र
....... रंग नयनी
....... झिंग उन्मनी

मन का उदास
जरी रंगे रास
मनी उरते आस
अतृप्त प्यास
अतृप्त प्यास
अतृप्त प्यास


Tuesday, 23 August 2016

वेणी


वेणीचा ग पेड झुलून रिदयास डसला
नागिणीचा दंश जहरी अंगाअंगी भिनला

माळल्या ग पानामंदी जीव माजा गुतला
केवड्याच्या वासावर नागावानी भुलला

शेपटा ग सरसरून कमरेखाली  डोलला
प्राण जाला कासावीस श्वास माजा बांदला

झटका ग गोल फिरून मान गळा वेढला
वेटोळला पाश तुजा माज्या गळा लागला

शेपटा ग खेळवता तू जीव माजा खुळावला
झोका माजा उंच उंच आभाळाला भिडला


Thursday, 18 August 2016

रानफुले


कोरडे माझे अंगण जरी
पाऊस अंगणात आला
माझा पाऊस तिने ..
... दूर दूर नेला

थंडगार झुळूक फिरली                    
गर्द रानावनात
फुले माझी हळूच सारली                        
तिने भर उन्हात

तिच्या पावलांखाली                    
ह्रदय ठेवले मांडून
परतीच्या वाटेवर ते
तिथेच गेले कांडून

माळावरच्या म्हातार्‍याला
कळले होते गुपीत    
माझ्यासोबत तोही होता
रानफुले वेचीत


Friday, 5 August 2016

सरीवर सरी


सरीवर सरी आल्या पावसाच्या भारी
ऐक माझं पोरी जरा रहा आज घरी

फोफावली वावटळ घालते रिंगण
खोल खोल तळे झाले अंगण अंगण
गडगड गडगड ढग जड बोले
कडकड वीज कशी कुठेही कोसळे
उन्मळून झाड बघ धराशायी झाले
सवे त्याच्या शेजारचे घरही झोपले
नदीलाही झिंग आली धावते बेफाम
तीरालाही ओळखेना सुटे बेलगाम
शेती घातली पोटात आली वेशीपाशी
घास गिळण्या गावाचा झाली वेडीपिशी
भिजलेल्या काळजात खोल ऊठे कळ
दाही दिशी पसरला सैतानी झाकोळ
पावलोपावली महाकाल दबा धरी
पुसू जाता एका दिसे दुजा शोक करी

ऐक माझं पोरी जरा रहा आज घरी
सरीवर सरी आल्या पावसाच्या भारी


Thursday, 4 August 2016

तू येताना ... आणि जाताना


जाणवला माझ्यातला जिवंतपणा ..
तू येताना ... आणि जाताना          

येताना ऐकू येत होती ह्रदयाची धडधड
जाताना श्वास उगाचच झाला होता जड

येताना बेफिकीर .. चहुबाजूला पहाणे
पण फितूर डोळ्यांचे आतुर होणे
जाताना डोळ्यात काही शिरल्याचे बहाणे
आणि अलगद पाणी टिपून माघारी वळणे

हातांची थरथर अणि शरीराला कंप
येताना हुरहूर व्यापून टाकते अंग
जाताना शरीरही पुकारते संप
चेहराही पडतो .. उडून जातो रंग

येतेस ती येतेस .. चेतना जागवतेस
प्राण फुंकून देहात .. परत का जातेस


Sunday, 24 July 2016

आठवतय का तुला ....


आठवतय का तुला ....
छत्री लपवून चेहर्‍यावर विसरण्याचा भाव
आणि एकाच छत्रीत भिजण्याचा तुझा डाव
पाऊसही लबाड .. तुलाच साथ द्यायचा
तू ज्या कडेला .. तिकडेच बरसायचा
मग तू त्याच्याकडे सरळ करायचीस पाठ
मला घट्ट चिकटून न भिजण्याचा प्रयत्न आटोकाट
छत्रीला मात्र नाहीच कधी कळायचे
तारांवरचे ओघळ सर्वांग भिजवायचे
खांद्यावर हलकेच विसावलेला माझा हात
माझ्या कुशीत अलवार शिरत तू दिलेली साद
भिजलेल्या अंगाने हलकेच साधलेली जवळीक
नजरेत लटका राग जणू मीच केली आगळीक
कुंद हवा, धुंद मन, ओला सहवास
वाटे चालूच रहावा हा न संपणारा प्रवास
पावलंही थबकत थबकत चालायची
माझी चालली की तुझी जड व्हायची
मुक्कामाला पोचताना तुझी अधीरता वाढायची
तुझी भावना माझ्याही नजरेत उतरायची

आठवतय ना तुला ....
मग बघ ना बाहेर खिडकीतून
तस्साच पाऊस पडतोय अफलातून
छत्रीही नाही सापडत माझी
येताना आणशील ना तुझी
पुन्हा तसेच भिजू, फिरू,
आठवणी ताज्या करू
...........
...........
आता तू येणार नाहीस ....
आता तू येणार नाहीस .... पण हे मन .. नाही मानत
आठवणींच्या पागोळ्यात अजून बसलय भिजत
आठवणींच्या पागोळ्यात अजून बसलय भिजत


Friday, 22 July 2016

साथिया


सूना सा दिल हैं  ..
सूनी सी धडकन ..
सूना हैं मेरा जिया

तेरे बिना मेरा ..
बीते नही पल ..
ओ मेरे साssथिया
साथियाsss  तू कहाँ

जमी से मिले आसमां ...
ऐसा हुवा है कहाँ

ये मिलन जो देखा ..
है नजारों का धोका ..
फिर भी ये दिल माने ना

साथियाsss  तू कहाँ
तेरे बिना मेरा ..
बीते नही पल ..
ओ मेरे साssथिया

दिन मे जो रोशन रवी ...
रातमे खोया कही

इक पल उजाला ..
इक पल हो धुंधला ..
कैसा जहाँ ये बना

साथियाsss  तू कहाँ
तेरे बिना मेरा ..
बीते नही पल ..
ओ मेरे साssथिया

हलचल है मनकी गली ..
बेचैन है हर कली

महकी हवाओ ने ..
बहकी निगाहों ने ..
चहका दिया आंगना

साथियाsss  तू कहाँ
तेरे बिना मेरा ..
बीते नही पल ..
ओ मेरे साssथिया

सूना सा दिल हैं  ..
सूनी सी धडकन ..
सूना हैं मेरा जिया

तेरे बिना मेरा ..
बीते नही पल ..
ओ मेरे साssथिया
साथियाsss  तू कहाँ


Thursday, 21 July 2016

आदिशक्ति


हे मनोहरिणी,  शांतस्वरुपिणी,
त्रिकालभ्रमणी, सुहास्य वदने,
वर दे .. वर दे .. वर दे
कालीरुपी त्वम् .. शिर तव चरणम्
भव भय हरणम् .. हिमवती शरणम्
वंदे .. वंदे .. वंदे

कोटी कोटी शंख ... गरजत गगन निनादे
लक्ष लक्ष पद्म ... पदी पदी कमल विराजे
तप्त रुद्र नेत्र ... ज्वल ज्वल अग्नी लोचनी
मृत्यू रूप चक्षु ... परि तू मंद मंद मृगनयनी
कालीरुपी त्वम्  .. शिर तव चरणम्
भव भय हरणम् .. हिमवती शरणम्
वंदे .. वंदे .. वंदे
हे मनोहरिणी,  शांतस्वरुपिणी,
त्रिकालभ्रमणी, सुहास्य वदने,
वर दे .. वर दे .. वर दे

रक्तबीज शोषण ... असुर निखंदिनी
प्रचंड चंड मुंड ... खड्गे खंड खंडिनी      
शुंभ निशुंभ अशुभा ... पग पग मद निर्दालिनी
महिमहिषासुर मर्दना ... आदिशक्ति शूलधारिणी
कालीरुपी त्वम्  .. शिर तव चरणम्
भव भय हरणम् .. हिमवती शरणम् ...
वंदे .. वंदे .. वंदे
हे मनोहरिणी,  शांतस्वरुपिणी,
त्रिकालभ्रमणी, सुहास्य वदने,
वर दे .. वर दे .. वर दे
कालीरुपी त्वम्  .. शिर तव चरणम्
भव भय हरणम् .. हिमवती शरणम् ...
वंदे .. वंदे .. वंदे


Wednesday, 20 July 2016

आमंत्रण


तुझा .... माझा काय संबंध
संबंध म्हणू की ऋणानुबंध
का आवडतोस तू मला ...आणि मी तुला
आठवण येताच ... का ओढ पडते काळजाला
तुझ्या माझ्या सयीने भारून गेलाय मनाचा गाभारा
हर घडी एकाच लयीत वाजतोय ह्रदयाचा नगारा
मोजून बघ ना ठोका न् ठोका
एकच ताल अन् एकच ठेका
सोबत तुझ्या मुरलीची तान
आणि मग माझं मन बेभान
आसमंतात अजब गजब रंगांची उधळण
डोळ्यात तुझ्या नाना रुपांची घुसळण
घट्ट मिटले होऊन अनावर
तर शरीरभर पसरते रे लहर
आणि मग सुटते नियंत्रण
उरते फक्त ..... आमंत्रण
उरते फक्त ..... आमंत्रण
उरते फक्त ..... आमंत्रण


Tuesday, 19 July 2016

सांस अभी बाकी है


सांस अभी बाकी है
सांस अभी बाकी है,

ले ले और इम्तिहान
लिखना तो तुझे है ..
या पर्चा पुरा पुरा
... या सांस पे ठप्पा
सांस अभी बाकी है
सांस अभी बाकी है

इस पार या उस पार ...
जीत तो तेरी है
मझधार में डूबे तो ...
मझधार भी तेरी है
बहाव भी तू,
किनारा भी तू,
मिले जिस दरिया,
वो सागर भी तू

मै बस बेबस,
बेजान सा मंजर ...
अस्थिपंजर जिसमें ...
सांस अभी बाकी है ...
सांस अभी बाकी है ...
सांस अभी बाकी है ...

Monday, 18 July 2016

डोळे


पापणीच्या कोंदणात
एक पाकळी लपून
कोनातून लाजे लाजे
पाहे हलके उमलून

श्वेत नभांगणामध्ये
निळी बाहुली रुजून
झेप घेता पंख गेले
निळाईत त्या रुतून

तुझ्या काजळी डोहात
सूर मारला गुंगून
पापणीच्या वेलीमधे
श्वास गेलाय गुंतून

भिवईच्या कमानीने
बाण हलके सोडून
बांधियले नजरेस
ऐसी मोहिनी घालून

सृष्टि गायब विरून
दृष्टि गेली झाकोळून
दोन नजरा झरल्या
एकमेकां मिसळून



Sunday, 17 July 2016

जुस्तजू

उन्हे पलको पे बिठाया तो
खिसक के आंखों में उतर आये
अब पलक बंद करे तो वो कैद हो,
न करे तो नींद उड जाये

उलझे रहे हम तब तक
उतर के दिल मे सिमट गये
दस्तक है उनकी या मेरी धडकन,
हम और उलझ गये

पलको का झपकना बंद,
पर दिल का क्या करे
धडकन मे बसाये या
दिल उनके हवाले करे

अब न दिल मेरा न धडकन
.. बस तू ही तू है
मुझसे "मै" कहा खोया,
यही जुस्तजू है



Sunday, 26 June 2016

तूच आलीस ... पाऊस बनून


मला माहित आहे ... मी बोलावलं म्हणून
तूच आलीस ... पाऊस बनून

गालावर चुंबून पहिलाच थेंब ...
तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेला
मागोमाग मातीचा सुखद सुगंध ...
तुझा ओला सहवास दरवळला

थेंबाथेंबाने अलवारपणे ...
माझे सर्वांग स्पर्शून
तूच आलीस ... पाऊस बनून
मला माहित आहे ... मी बोलावलं म्हणून

थेंबाळ सरी अन सरींचे ओघळ ...
तुझा आवेग हळूच बनला वादळ
चिंब भिजून ... गात्रागात्रात ...
सळसळत शिरला तुझा कोसळ

मग तू बेभान बरसलीस ...
भन्नाट वार्‍यावर स्वार होऊन
तूच आलीस ... पाऊस बनून
मला माहित आहे ... मी बोलावलं म्हणून

रसरसून ... तुझ्या मिठीत नहात नहात ...
आसूसून ... कवटाळले मीही माझे दोन्ही हात
तू खळखळून हसलीस ना ...
माझा वेडेपणा पहात पहात

आलीस ... तशीच अकस्मात गेलीस ...
मोहरले क्षण मागे ठेवून
मला माहित आहे ... मी बोलावलं म्हणून
तूच आलीस ... पाऊस बनून
तूच आलीस ... पाऊस बनून
तूच आलीस ... पाऊस बनून


Monday, 20 June 2016

तेरा नाम


हो कबूल मेरा .. आखरी पयाम
होठों पे आये ..... तेरा नाम

थक गये है नैन भी ये .. दरस के मारे
दिल भी टूटा यारा माना .. हम नही है तेरे
उम्मीद मेरी .. नाकाम
होठों पे फिरभी ..... तेरा नाम

हो कबूल मेरा .. आखरी पयाम
होठों पे आये ..... तेरा नाम

जितना छिपाने जाऊं .. उतना ही छलके
दर्द ने भी दम तोडा है .. बंद हुई पलके
रूह के मिटे है .. आयाम
होठों पे फिरभी ..... तेरा नाम

हो कबूल मेरा .. आखरी पयाम
होठों पे आये ..... तेरा नाम



Thursday, 16 June 2016

माया


हरी शोधता या जनी .. हरी लपे तुझ्या मनी
मनी सापडला हरी .. जना सांगे मीच हरी
त्याच क्षणा सटकूनी .. हरी पसरला जनी
हरी आहे कणी कणी .. कवणे सांगावे कवणी

सारी सृष्टी करा गोळा .. त्यात एकाला वगळा
कैसा हरी सापडेल .. तोही तुला वगळेल
जरी गवसला हरी .. तरी रिता दोन्ही करी
माये घातलेली मिठी .. सोडवेना सुखासुखी

दैवे दिला दैवयोग .. कर्मे मागे लागे भोग
राज्य त्रैलोक्य लाभले .. गुहेमाजी का लपले
रत्न माणकाची प्रभा .. जैसा रवी उजळे नभा
कवळी अंधाराचा गाभा .. नाही सोडवेना लोभा

तहानल्या ओंजळीत .. अमृताचे थेंब आले
ओंजळीचे गंगाजल .. सांडपाण्याशी सोडले
सोस संपेना जीवाचा .. शव होऊ झाली काया
ठेवी धरोनिया माया .. आयुष्य जाते वाया



Saturday, 11 June 2016

सुन ना ऐ मेरे यार


सुनने को बेकरार
कह दो ना मेरे यार
बस सिर्फ एक बार
है तुमको भी ... मुझसे प्यार
मिलने पे बरसे है
तू भी तो तरसे है
करने को मेरा .. दीदार

साकी मिला है मनसा ...
फिर भी है जीवन प्यासा ...
साकी है क्यों ये दूरी ...
बुझती न प्यास मेरी ...
सुन ना ऐ मेरे यार
बस सिर्फ एक बार
पिला दे हाथो से .... तू सुरा

मिलने पे बरसे है
तू भी तो तरसे है
करने को मेरा .. दीदार
सुनने को बेकरार
कह दो ना मेरे यार
बस सिर्फ एक बार
है तुमको भी ... मुझसे प्यार

सरगम है साज हैं ...
सुरमयी आवाज हैं ...
नगमों का साज हैं ...
प्यारे अल्फाज हैं ...
सुन ना ऐ मेरे यार
बस सिर्फ एक बार
छेड जा तू मेरे ... दिल का तार

मिलने पे बरसे है
तू भी तो तरसे है
करने को मेरा .. दीदार
सुनने को बेकरार
कह दो ना मेरे यार
बस सिर्फ एक बार 
है तुमको भी ... मुझसे प्यार

धडकन आलापिनी ...
ना कर तू अनसुनी ...
चाहत की ये कहानी ...
बन जाये ना विरानी
सुन ना ऐ मेरे यार
बस सिर्फ एक बार
सुन ले तेरे दिल की .. तू पुकार

मिलने पे बरसे है
तू भी तो तरसे है
करने को मेरा .. दीदार
सुनने को बेकरार
कह दो ना मेरे यार
बस सिर्फ एक बार 
है तुमको भी ... मुझसे प्यार


इंतजार



जब बहे ठंडी पवन .. चांदनी रातों में
थरथरा उठे लहर .. झील के पानी में

चांद की परछाई .. क्यों मुझे याद आई
क्यों मुझे ऐसा लगे .. वक्त ले अंगडाई    
सरसरे पत्ता सुखा .. खोया मन आहट में
थरथरा उठे लहर .. झील के पानी में

ना कोई खुशबू है .. फिर हवा क्यों है महकी
खुश्क में दूर तक ये .. क्यों नजर बहकी बहकी
झिलमिला जाती है क्यों .. मदहोशी सासों में
थरथरा उठे लहर .. झील के पानी में

घाव ना जख्म कही पे .. क्यों समा लगता घायल
कौनसा सगुन जान के .. ये समा भी है कायल
कौन ये दस्तक देने .. उतरा है धडकन में
थरथरा उठे लहर .. झील के पानी में


Saturday, 4 June 2016

कोसळ



गारठू दे वेळ आणि श्वास माझा थांबू दे
पेटत्या ओठांवरी हे ओठ आता गोठू दे

अर्धोन्मलीन नेत्राना भासातच भुलू दे
अन तुझ्या मिठीमधे पुन्हा मला झुलू दे

भार झाल्या भावनांचे वस्त्र ही फेकून दे
चुंबनांनी पूर्ण माझे अंग तू माखून दे

कोसळू दे वीज आणिक नष्ट मजला होऊ दे
कोण उरते, मी की तू ते स्पष्ट मजला होऊ दे


Thursday, 2 June 2016

नीज नीज सानुली



हाताच्या पाळण्यात ..
.. जोजवतो अंगाई
टुकुर टुकुर पाहू नको ग
.. नीज नीज सानुली .. नीज नीज सानुली

डोळ्यांची चांदणी ..
.. मोहक लुकलुकताना
लोभस मुख "चंद्र" भासे ..
.. गोड हासताना
पापणीत अलगद मिटू दे ..
.. डोळ्यांची बाहुली
टुकुर टुकुर पाहू नको ग          
...नीज नीज सानुली .. नीज नीज सानुली

चांदोबा थकला खेळून ..
.. चांदण्यांसवे
आकाशी विखरून गेले ..
.. चांदण-थवे
लपंडाव खेळून दमली ..
.. ढगांसवे चांदुली
टुकुर टुकुर पाहू नको ग          
...नीज नीज सानुली .. नीज नीज सानुली




Sunday, 15 May 2016

भूतदया




मरणार्‍या कोंबडीची तडफड
पहावत नव्हती.
तिच्या कलकलाटाने आतडी
पिळवटून जात होती
"नको .. नको .. हत्या
निष्पाप पक्षाची"
खळगी कशीही
भरेल रे पोटाची

पोटात कोकलणार्‍या कावळ्यांनी
जीभेवर केला हल्ला
कोंबडी हवी कोंबडी हवी
एकच केला कल्ला

सकल सर्वार्थाने विचार केला
आणि नवल वर्तले पहा
शेवटी पक्षीप्रेम जिंकले
आणि
कोंबडी झाली स्वाहा






Friday, 13 May 2016

झोपाळू



डोळे मिटुनी तू जागा
उठुनी पाही जरा जगा
किती हलविले बघा बघा
निजुनी राही करी त्रागा ||
                                 
                  सखा म्हणे माझ्या मैतरा
                  काळ जातसे भराभरा
                  जागे व्हा रे जराजरा
                  त्वरा करा रे त्वरा करा ||

उभा सामोरी श्रीहरी
झोपाळू ते घरोघरी
सखा विनवितो परोपरी
म्हणा मुखाने हरी हरी ||








Tuesday, 26 April 2016

इंतजार

तू नही आयी मिलने दोबारा
मैं करता रहा ... इंतजार तेरा
ढुंढता .... ही रहा
मैं तुझे ... जाने कहा sss कहा

तू नही आयी मिलने दोबारा
मैं करता रहा ... इंतजार तेरा

आवाज मेरी क्यूँ तुझ तक न पहुँची
क्या है वजह जो तू मुझ तक न पहुँची
मै ढुंढता .... ही रहा
तुझे ... जाने कहा sss कहा                

तू नही आयी मिलने दोबारा
मैं करता रहा ... इंतजार तेरा

आहों में भर दू मैं कैसा असर अब
सासों ने खोया जो तेरा बसर अब
मै ढुंढता .... ही रहा
तुझे ... जाने कहा sss कहा

तू नही आयी मिलने दोबारा
मैं करता रहा ... इंतजार तेरा

ख्वाबों की सूनी सी लंबी डगर में
ओझल है मंझील .. धुंदली नजर में
ढुंढता .... ही रहा
मै तुझे ... जाने कहा sss कहा

तू नही आयी मिलने दोबारा
मैं करता रहा ... इंतजार तेरा



Friday, 22 April 2016

श्याम




श्याम आस श्याम प्यास श्याम ध्यास श्याम श्वास
श्याम शब्द श्याम मौन श्याम मन श्याम ध्यान

श्याम वेळ श्याम रंग श्याम नाम हाच छंद
श्याम तेल श्याम वात श्याम दीप मंद मंद
श्याम देव श्याम दैव श्याम भाव संग संग
श्याम चित्ती श्याम वृत्ती श्याम रुपी झाली दंग

श्याम आस श्याम प्यास श्याम ध्यास श्याम श्वास
श्याम शब्द श्याम मौन श्याम मन श्याम ध्यान


श्याम सुर्य श्याम चंद्र श्याम दिन श्याम रात
श्याम जळी श्याम स्थळी श्याम धरा अंबरात
श्याम स्वाद श्याम नाद श्याम गंध स्पंदनात
श्याम नील श्याम कृष्ण श्याम शुभ्र श्वेत श्वेत

श्याम आस श्याम प्यास श्याम ध्यास श्याम श्वास
श्याम शब्द श्याम मौन श्याम मन श्याम ध्यान





Thursday, 31 March 2016

रंग दे



दे ना रंग मोरा अंग, माही साजना
देना रंग तोरा संग, माही साजना

आ ना रीत बनके जगकी, तू अंगना
आना प्रीत बनके मनकी, मनमोहना
दे ना रंग मोरा अंग ...

ले ना नाम, हो बदनाम, प्रेम गलियां
लेना नाम, खिल जाये प्रेम कलियाँ
दे ना रंग मोरा अंग ...

सुन ना, कहती क्या दिलकी नादानिया
सुनना, कहती क्या दिलकी बेचैनिया
दे ना रंग मोरा अंग ...

खो ना दिल का निशाना बन के बावरे
खोना दिल की धडकन में मेरे सावरे
दे ना रंग मोरा अंग ...

जा ना चलके बिरह की डगरिया
जाना भरके मिलन की घगरिया
दे ना रंग मोरा अंग ...



Wednesday, 30 March 2016

द्वैत


तुझ्यात मी अन तू माझ्यातच तरी दरी का रुंदावी
दोन मनांचा एक निवारा, गाठ अशी का बांधावी ।।


उगमापाशी एक असूनी बनती दोन किनारे
एक बीज का शाखा बनूनी अलग अलग विस्तारे
व्यथा मनीची भळभळणारी कशी कुणाला सांगावी ।।

तुझ्यात मी अन तू माझ्यातच तरी दरी का रुंदावी
दोन मनांचा एक निवारा गाठ अशी का बांधावी ।।


एकसुरी ही अशी वेदना माझ्यातच का उमटावी
सलही माझा छळही माझा, मीच मला समजावी
मी माझ्यातच अन तू मोकळा, भेग कशी मग सांधावी ।।

तुझ्यात मी अन तू माझ्यातच तरी दरी का रुंदावी
दोन मनांचा एक निवारा गाठ अशी का बांधावी।।



Friday, 18 March 2016

शुभ रात्री



आधे अधूरे अपनो में
....... आधा अधूरा अपना मै
कब तू पुरा कर दे मुझे
........ देख रहा हूँ सपना मै


फिर एक नयी रात ..
     लायेगी नया सपना
अच्छा दिन कलका हो
     चालू है इंतजार अपना


रात का पल .. ऐ दिल जरा संभल
उनकी याद में .. नींद कहा आए
बिना नींद के .. सपना कहा आऐ
बिन सपने .. सजन कहा आए


पापण्यांच्या पाकळ्यांत
.... अलगद टिपले डोळे
तत्क्षणी तुझ्या सयीत
.... रमले मन भोळे


वाट तुझी पाहताना
.... रात्र सरत आहे
निद्रेविण आज पुन्हा
.... स्वप्न झुरत आहे


हलकेच सरकली पापणी
डोळ्यांस टाकले मिटवूनी
येशील का ग तू सजणी
आता तरी या नयनी


श्रांतला हा जीव आता
शांतली ही पापणी
जाणूनी हे रात्रही
गंभीर झाली निरवूनी




Thursday, 17 March 2016

बेलगाम




तुलाही नको मी ....
मलाही नको तू ....
परी रेशमाच्या ....
बंधा न ठावे ....

कसे ओळखावे ....
कुणा समजवावे
कुणाचे असे जे ....
बेलगाम मन धावे ..






नशा




ठाऊक आहे मला आता ...
पुन्हा असे घडणे नाही ...

छटाकभर नशा जरी ...
आयुष्य सारे झिंगून वाही ...

तुझ्या नजरेचा निसटता बाण ...
ती खूण ...
मी जपून आहे.

तू एकदाच पाहिलेस मला पण ...
तो क्षण ...
अजून स्मरून आहे.





Wednesday, 16 March 2016

निरीच्छ मी निर्विकार मी



निरीच्छ मी निर्विकार मी
ही भावना माझी खरी
परी माझिया वंशास देण्या
मज हवी मातब्बरी

मागणे मजसाठी नाही
ठाम मी हे जाण रे
पौत्र पौत्री यांस देण्या
द्रव्य दे आयुष्य दे

जगण्यास या विटलोय मी
हे आर्ततेने आळवी
अजूनी जरा आयुष्य दे
हे बोल उमटे अंतरी
                                                 
झोळी रिती दावून मी
धन धान्य भरले किती जरी
निरीच्छ मी निर्विकार मी
ही भावना माझी खरी



Friday, 11 March 2016

भिती



धावे मन वेगेवेगे
.... फैलावून हात
हमी काय गवसेल
.... मोकळ्या कवेत

तुटलेला धागा पुन्हा
.... कसा जुळणार
कसे मानू गाठ पुन्हा
.... नाही सुटणार

ओढावल्या भावनांनी
.... मन झाले क्षुब्ध
मधाळ चाहुल तिला
.... प्रतिसाद निःशब्द

उजळ दिशात वसते
.... अंधाराची क्षिती
पोळल्या मनात झिरपे
.... अनामिक भिती




Wednesday, 9 March 2016

प्रेम कोणावर करावं?




एकदा मी देवाला विचारले,
"प्रेम कोणावर करावं?"

देव हसला, म्हणाला,
"प्रेम सर्वांवर करावं"
   
"प्रेम आराध्यावर करावं ..
पुजा आवडली .. प्रेम करावं,
ज्योती आवडली .. प्रेम करावं.

प्रेम आरतीवर करावं..
प्रार्थना, अर्चना, वंदना,  उपासना ..
जी आवडेल .. प्रेम तिच्यावर करावं.

प्रेम करावं नदीवर ..
गंगा, यमुना, गोदावरीवर ..
सरस्वती, नर्मदा, कावेरीवर ..

प्रेम करावं दिशावर ..
पूर्वा, पश्चिमा, उत्तरा,
आणि दक्षिणावर ..

चंद्रावर किंवा चंदावर ..
प्रिती जरूर असावी.
पौर्णिमा, पूनम, चांदणी ..
सहज आवडून जावी.

प्रेम जडावं नक्षत्रावर ..
अश्विनी, रोहिणी, कृत्तिकावर ..
फाल्गुनी, आश्लेषा, अनुराधावर ..
रेवती, स्वाती, चित्रा, आणि विशाखावर ..
प्रेम सर्वांवर करावं.

आशयघन प्रेरणा ..
सुंदर रचना ..
कला, कल्पना ..
सर्वांवर प्रेम करावं.

नटलेली वसुधा आणि
सुंदर चित्रावरसुद्धा प्रेम करावं.

प्रेम तनुवर करावं ..
अनामिका आणि अंजलीवर करावं ..
शिखा, कर्णिका आणि नेत्रावर करावं.

भाळावे सौंदर्यावर आणि  ऐश्वर्यावर ..
भाळावे  किर्तीवर, भक्तीवर आणि शक्तीवर ..
तसेच तृष्णा आणि तृप्ती ..
दोन्हीवर प्रेम करावं.

प्रेम निर्मळ असतं.
सहज जमून गेलं ..
त्यांनाच जमतं.
निर्मळता नसेल ..
तर उरते वासना ..
आणि ..
शरीराशी निगडीत भावना ..
मग प्रेम असतं फक्त नावावर ..
त्या त्या नावाच्या शरीरावर ..

प्रेम सर्वांवर करावं ..
पण शरीराच्या पल्याड जाऊन मनावर करावं.

शक्य तितक सांगितलं.
बघ तुला कितपत समजलं."

म्हटलं तर सरळ
म्हटलं तर गहन
विचारात गढलय
माझं मन






Thursday, 25 February 2016

धुंदी




धुंद मी बेधुंद मी, ओलावला मृदगंध मी
सप्तरंगी पसरला धनु,  त्यातला हर रंग मी

धुंद मी बेधुंद मी, केवड्याच्या संग मी
याद येता अंतरंगी उमटला आनंद मी

धुंद मी बेधुंद मी, अन वेणूमधली शीळ मी
लहरणारा बहरणारा बहकणारा नाद मी

धुंद मी बेधुंद मी, फुलती कळ्या श्वासातुनी
गंधण्या मी स्पर्शिता मग,  फुल चुरते लाजूनी

धुंद मी बेधुंद मी जरी विहरतो स्वप्नातूनी
वास्तवाच्या विस्तवाने पोळतो जागेपणी






Monday, 22 February 2016

तुमची आमची कथा




कोर्‍या चेहर्‍याने ....
चार माकडं ...
आपापल्या जागी ...
एका भिंतीवर ...
रोज बसायची ...
विशिष्ट वेळी ...
एक माकडीण ....
आपल्याच नादात ....
समोरन पास व्हायची ....
माकडं तिला पाहायची ....
.... न्याहाळायची
माकडीण यायची ....
अन्  निघून जायची ....
माकडं हताश ....
शेजारी पाहायची ....
शेजारची पडलेली नजर ....
बरच काही बोलायची ....
"तुलाही पाहिले नाही" ....
मनात खूष व्हायची ....
"काय पण झाल नाही" ....
पुन्हा चेहरा कोरा करायची ....

वळशील तू




तुझी वाट हेरून  .....
वाटेवर नजर पेरून  ....
कधीतरी दिवसातून ...
एकदा ....
कधीकधी अनेकदा ....
शरीराबरोबर रेंगाळत असतं
.... मन


वळशील तू ....
नजर माझी उतरेल ...
पुन्हा एकदा ...
तुझ्या डोळ्यातून ....
ह्रदयात खोलवर ....
जिथे पुन्हा घडेल ...
मला माझेच
...दर्शन



Sunday, 21 February 2016

विलीन



वळताच नजर माझ्याकडे मी हरखून जाते
नजरेच्या डोहात .. खोल खोल हरवून जाते
आणि होतो खेळ खलास

नजर झुकते खाली
खुदकन खुलते खळी
डोळ्यात उतरते नशा
धुक्यात हरवतात दिशा
अंगाच मोरपीस नजरेच्या स्पर्शाने मोहित होते
आणि होतो खेळ खलास

वळताच नजर माझ्याकडे मी हरखून जाते
नजरेच्या डोहात .. खोल खोल हरवून जाते

जहरी डंख उतरतो थेट ह्रदयी
क्षणात भिनते कळ मस्तकी
सरसरून गात्रात भिनतो दंश
मीपण सरते उरतो फक्त तुझाच अंश
कळत नाही कशी मी तुझ्यात विलीन होते
आणि होतो खेळ खलास

वळताच नजर माझ्याकडे मी हरखून जाते
नजरेच्या डोहात .. खोल खोल हरवून जाते