ती बोलताना .. अन् मी ऐकताना
ते अधरद्वय पाहुन ... ना शब्द उतरले श्रवणी
त्या अधरद्वयी मोहुन ... काहूर उसळले मनी
खिळली दृष्टी .. हरपले भान
निःशब्द कान .. फक्त .. मौनाचे ध्यान
ती बोलताना .. ओठांच्या डुलणार्या पाकळ्या
माझी संमोहित नजर .. हेलकावणारा मनझुला
हिंदकळणार्या ह्रदयात .. गोड नाजूक कळा
फुलपंखी फडफड ओठांची
हळूच मिटावी
दोन बोटांच्या चिमटीने
की टिपावी मऊशार साय
अलगद एकाच बोटाने
व्हावे भ्रमर अन् कैद .. त्या कमल द्विदली
अन जावे निजून .. त्या अधर- मलमली
लाल गुलाबी ओठांची वक्र कमान
थेंबावे हलकेच त्यावर ..
जणू दवबिंदू विराजमान
मिटताच ओठ दुमडून ...
हलकेच उतरावे जिवणीवर
अन घसरून आत
मिसळून रक्तात
शिरावे ह्रदयात ..
पुन्हा पुन्हा ..
पुन्हा पुन्हा ..
ती बोलताना ... ती बोलताना ... ती बोलताना