हरी शोधता या जनी .. हरी लपे तुझ्या मनी
मनी सापडला हरी .. जना सांगे मीच हरी
त्याच क्षणा सटकूनी .. हरी पसरला जनी
हरी आहे कणी कणी .. कवणे सांगावे कवणी
सारी सृष्टी करा गोळा .. त्यात एकाला वगळा
कैसा हरी सापडेल .. तोही तुला वगळेल
जरी गवसला हरी .. तरी रिता दोन्ही करी
माये घातलेली मिठी .. सोडवेना सुखासुखी
दैवे दिला दैवयोग .. कर्मे मागे लागे भोग
राज्य त्रैलोक्य लाभले .. गुहेमाजी का लपले
रत्न माणकाची प्रभा .. जैसा रवी उजळे नभा
कवळी अंधाराचा गाभा .. नाही सोडवेना लोभा
तहानल्या ओंजळीत .. अमृताचे थेंब आले
ओंजळीचे गंगाजल .. सांडपाण्याशी सोडले
सोस संपेना जीवाचा .. शव होऊ झाली काया
ठेवी धरोनिया माया .. आयुष्य जाते वाया
No comments:
Post a Comment