आठवतय का तुला ....
छत्री लपवून चेहर्यावर विसरण्याचा भाव
आणि एकाच छत्रीत भिजण्याचा तुझा डाव
पाऊसही लबाड .. तुलाच साथ द्यायचा
तू ज्या कडेला .. तिकडेच बरसायचा
मग तू त्याच्याकडे सरळ करायचीस पाठ
मला घट्ट चिकटून न भिजण्याचा प्रयत्न आटोकाट
छत्रीला मात्र नाहीच कधी कळायचे
तारांवरचे ओघळ सर्वांग भिजवायचे
खांद्यावर हलकेच विसावलेला माझा हात
माझ्या कुशीत अलवार शिरत तू दिलेली साद
भिजलेल्या अंगाने हलकेच साधलेली जवळीक
नजरेत लटका राग जणू मीच केली आगळीक
कुंद हवा, धुंद मन, ओला सहवास
वाटे चालूच रहावा हा न संपणारा प्रवास
पावलंही थबकत थबकत चालायची
माझी चालली की तुझी जड व्हायची
मुक्कामाला पोचताना तुझी अधीरता वाढायची
तुझी भावना माझ्याही नजरेत उतरायची
आठवतय ना तुला ....
मग बघ ना बाहेर खिडकीतून
तस्साच पाऊस पडतोय अफलातून
छत्रीही नाही सापडत माझी
येताना आणशील ना तुझी
पुन्हा तसेच भिजू, फिरू,
आठवणी ताज्या करू
...........
...........
आता तू येणार नाहीस ....
आता तू येणार नाहीस .... पण हे मन .. नाही मानत
आठवणींच्या पागोळ्यात अजून बसलय भिजत
आठवणींच्या पागोळ्यात अजून बसलय भिजत