Monday, 26 September 2016

अधुरे गीत



अजून आहे गीत अधुरे ऐकवू तुजला कसे
शब्द अधुरे बोल अधुरे प्रीतही अधुरी असे

रे सख्या या मंद रात्री शेज ही सोडी उसासे
गर्द हिरव्या बांबू बनी या शीळ उसवून विरतसे

बहरल्या गात्रास स्पर्शे हिमलहर मग आतुनी
चेतलेली यज्ञवेदी अर्ध यज्ञी विझतसे

निजवलेल्या लोचनांनी स्वप्न दिधले सजवूनी
अर्धरात्रि अर्धनिद्री स्वप्न नयनी थिजतसे

हर घडी हर पावली अतृप्ती सखया छळतसे
त्या नशील्या भावनांना शब्दी मी बांधू कसे

गूढ गर्भी सावल्यांचा जीवघेणा खेळ चाले
भास की आभास, पक्षी फेर हा घालीतसे

कान वाजे चाहुली, पाऊल दिसे? नुसते ठसे?
कृष्ण रात्री कृष्ण नेत्री कृष्ण कृष्ण दिसतसे


Monday, 5 September 2016

तुजा माजा पिरेम


पिरेमाच्या वाटमंदी सदाच असतय काटं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

म्हाईत हाय मला .. तुजा बी जडलाय जीव
पन मनात तू ठरू दिना, आपल्या पिरेमाची नीव
पुरं जाला नखरा .. नग आढेवेढे घेऊ
दिऊन टाक होकार अन म्हन "आय लव यू"
उगड व्हट , मग बघ कसं मन आनंदानं न्हातं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

व्हय .. माजी कमाई हुते 20 तारकंला फस्त
तुजा पगार बी हाय .. माज्यापेक्षा जास्त
पन पैसा बगून पिरेम न्हाई .. येव्हार व्हतो
जीव मात्र पैक्यावर न्हाई .. मानसावर जडतो
तुला बी ठाव हाय .. हे कारन येकदम खोटं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

आयला, तुजा आतला आवाज .. लई तरास दितो
खरच का ग सारका तुला 'लांब र्‍हा' म्हंतो
नजर तुजी लई द्वाड .. खरं खरं सांगते
नजरानजर व्हताच .. तुज गुपीत उलगडते
बगताना मला ... तुज लवंत न्हाई पातं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

मानलं आपल्या वयात बी लय अंतर हाय
पन पिरमामधी वय बिय बगायचच नाय
मन लय वंगाळ सारक वढाय वढाय
लोकलज्जेखातर लागलं कुढाय कुढाय
गावगप्पा करायला तेंच काय जातं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

मी काय देकणा नाय .. रूप माज डावं
पर तू बी नाय रूपवान .. तुलाबी हाय ठावं
आई-बा ची नापसंती .. कारन येकदम बंडल
तुजा पक्का इचार बग .. तेन्ला बी बदलंल
व्हय म्हन .. मग बग समदं ग्वाड ग्वाड व्हतं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं

पिरेमाच्या वाटमंदी सदाच असतय काटं
आता कायबी कारन सांगून .. तू फोडू नगं फाटं