Sunday, 16 February 2014

वाटचाल एक साथ ५० वर्षे



मधामधे भिजल्या शब्दा ... जिव्हेवर ठेवू
तुझ्या सुरामध्ये माझ्या ... स्वरांना नहावू
आज पुन्हा आठवूनी ... गीत जुने गाऊ

झुंज वादळाशी घेत ... तुझी माझी साथ
झेलेले ते सारे घाव ... गुंफुनीया हात
एक क्षणा विसरुनी सारे ... मिसळूनिया जाऊ
आज पुन्हा आठवूनी ... गीत जुने गाऊ

वाट चालताना ... किती पुढे आलो
जीवनरथ धावताना ... चाके दोन झालो
एक साथ दोन्ही डोळे ... आरशात पाहू
आज पुन्हा आठवूनी ... गीत जुने गाऊ

मनी लहर झंकारली या ... जरी तू अबोल
नव्याची नव्हाळी नाही ... तरी अनमोल
पापणीत चांदण्यांचा ... दिवा पुन्हा तेवू
आज पुन्हा आठवूनी ... गीत जुने गाऊ




Sunday, 2 February 2014

नवा डाव नवा खेळ

पुन्हा एक नवे वर्ष
पुन्हा एक नवी वेळ
पुन्हा सुरु करा चला
नवा डाव नवा खेळ

सवयीचा गुलाम म्हणतो 
जुने दळण पुन्हा दळा 
घडाळ्याच्या काट्यावरती
पुन्हा एकदा पळा पळा 

सकारात्मक स्वीकार करा
गुलामाचे विचार टाळा
जुने जीर्ण सोडा आता
नव्याकडे सारे वळा

विचारांची भरवा शाळा
विचारांचा फुलवा मळा 
विचारांच्या मेळ्यांमध्ये
विचारांचे पीठ मळा

दिव्यामध्ये पुन्हा तेल 
भरून नवी वात जाळा 
काळोखाच्या आक्रोशातून
प्रकाशाचे गाणे उजळा 

प्रकाशाच्या नाना तऱ्हा
कोवळे ऊन मध्यान्ही झळा
जीवनाच्या अंगी पहा 
नाना रंग नाना कळा

जीवनाच्या रेसमध्ये
जोर लावून पुन्हा पळा
ध्येय पुन्हा गाठण्यासाठी
धीर धरा सोसा कळा

पुन्हा सुरु करा चला
नवा डाव नवा खेळ
पुन्हा एक नवे वर्ष
पुन्हा एक नवी वेळ