Wednesday, 30 March 2016

द्वैत

तुझ्यात मी अन तू माझ्यातच तरी दरी का रुंदावी
दोन मनांचा एक निवारा, गाठ अशी का बांधावी ।।

उगमापाशी एक असूनी बनती दोन किनारे
एक बीज का शाखा बनूनी अलग अलग विस्तारे
व्यथा मनीची भळभळणारी कशी कुणाला सांगावी ।।

तुझ्यात मी अन तू माझ्यातच तरी दरी का रुंदावी
दोन मनांचा एक निवारा गाठ अशी का बांधावी ।।

एकसुरी ही अशी वेदना माझ्यातच का उमटावी
सलही माझा छळही माझा, मीच मला समजावी
मी माझ्यातच अन तू मोकळा, भेग कशी मग सांधावी ।।

तुझ्यात मी अन तू माझ्यातच तरी दरी का रुंदावी
दोन मनांचा एक निवारा गाठ अशी का बांधावी।।

No comments: