अजून आहे गीत अधुरे ऐकवू तुजला कसे
शब्द अधुरे बोल अधुरे प्रीतही अधुरी असे
रे सख्या या मंद रात्री शेज ही सोडी उसासे
गर्द हिरव्या बांबू बनी या शीळ उसवून विरतसे
बहरल्या गात्रास स्पर्शे हिमलहर मग आतुनी
चेतलेली यज्ञवेदी अर्ध यज्ञी विझतसे
निजवलेल्या लोचनांनी स्वप्न दिधले सजवूनी
अर्धरात्रि अर्धनिद्री स्वप्न नयनी थिजतसे
हर घडी हर पावली अतृप्ती सखया छळतसे
त्या नशील्या भावनांना शब्दी मी बांधू कसे
गूढ गर्भी सावल्यांचा जीवघेणा खेळ चाले
भास की आभास, पक्षी फेर हा घालीतसे
कान वाजे चाहुली, पाऊल दिसे? नुसते ठसे?
कृष्ण रात्री कृष्ण नेत्री कृष्ण कृष्ण दिसतसे
No comments:
Post a Comment