Thursday, 13 July 2017

ओलेती



सर्र सर्र थरारून
सरीवर सरी आल्या
तुझ्या भवती धरला
फेर नाचत नाचत

तुला ओलेती पाहून
पाऊस खुळावला
अन थांबून राहिला
तुला पहात पहात

त्वचा नितळ स्पर्शून
तोही झाला चिंब ओला
सरसरत शिरला
तुझ्या कुशीत कुशीत

घराकडे वेगेवेगे
जशी पाऊले ऊचली
झोड लावून पाऊस
चारी दिशांना झाकोळी

चेकाळल्या पावसाची
वारा पाही झोंबाझोंबी
भर्र भर्र भरारून
वारा झोंबे थेंबाथेंबी

वारा पावसाची झुंज
हवा झाली कुंद कुंद
थरथर तुझी वेल
अंगी कंपित कंपित

क्षितीजापल्याड नेले
काळे नभ ढकलून
जिंकला ग बाई वारा
पावसाशी झगडून

वारा फुंकर घालून
दूर करी ओलेपण
त्याच्या स्पर्शाने मिटली
तू ग लाजून लाजून
तू ग लाजून लाजून