कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी
आनंदाने उसळून येती कालिंदी लहरी
रवंथ करती गायी किनारी टवकारूनी कान
श्रवण करोनी होती सचेतन काळे पाषाण
गोप गोपिका शिल्प जाहले स्मृती भ्रंश होऊनी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी
झाडावरचे स्तब्ध जाहले एक एक पान
पक्षी स्थिरावे फांदीवरती ऐकून मंजूळ तान
माथ्यावरचे मोरपीस मग डुलले मोहरूनी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी
दाह रवीचाअलगद साहुनी नभ पांघरती दुलई
हरी दर्शना रवीकिरणांनी छेदियली निळई
क्षणभर बासरी वादन ऐकून किरण विरे चरणी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी
अधर हरीचे हळूच चुंबिती बासरीचे ओठी
मधुर स्वरांची माळ उमटते बासरीचे पोटी
नादामधुनी कणा कणातून कृष्ण कृष्ण विस्तारी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी