Friday, 26 January 2018

प्रीत

तुझी माझी .. प्रीत का रे .. जुळता जुळेना
का रे माझी .. प्रीत तुला .. कळूनी कळेना

मन माझे ..माझे जरी .. मनी माझ्या .. तूच वसे
दिसे ना तू .. क्षणभरी .. मन होते .. वेडेपिसे
कुशीमधे .. तुझ्या जरी .. मन का रमेना
का रे माझी .. प्रीत तुला .. कळूनी कळेना

राधा तुझी .. मीरा तुझी .. भला मोठा .. राणीवसा
मनी कुठे .. कोपऱ्यात .. माझा का न .. छोटा ठसा
तुझ्या मनी .. माझी छबी .. मला का दिसेना
का रे माझी प्रीत तुला .. कळूनी कळेना

नदी मिळे .. जशी नदा .. नदी ऊरे  ना रे नदी
मिसळूनी तुझ्यामधे .. संपेन का मीही कधी
आसुसून धावे मीही .. नदा का मिळेना
का रे माझी .. प्रीत तुला .. कळूनी कळेना
तुझी माझी .. प्रीत का रे .. जुळता जुळेना

24 डिसेंबर, 2017

Friday, 19 January 2018

लावणी

दाणे घालून राया तुम्ही भुलवू नका
नजर रोखून राया तुम्ही भिववू नका
माझ्या कबुतरांना हात लावू नका

जीवा-भावाने जपलीय जोडी
नका करू तुम्ही लाडीगोडी
ठाव हाये तयांना तुमची खोडी
तुम्हा पाहून मारलीय दडी
लाज अडवी तयांना तुम्ही निरखू नका
माझ्या कबुतरांना हात लावू नका

दिसामासान वाढतीय काया
एक दुजाची भासे जणू छाया
लई नाजूक साजूक माया
नका जावू तयांना धराया
स्पर्श करून तंग त्यांना करू नका
माझ्या कबुतरांना हात लावू नका


Thursday, 11 January 2018

रुसवा

पैलतीरावर राधा झुरते, ऐकण्यास मुरलीची तान
ऐलतीरी मुरलीचा रुसवा, घनश्याम हैराण

ओठावरती मला धरी परी मनात वसते राधा
ओठामधूनी फुंकर येते, त्यातही ठसते राधा
चुंबून मजला, स्पर्शून मजला, का करिशी बेभान
ऐलतीरी मुरलीचा रुसवा, घनश्याम हैराण

मधुर उमटली धुन, देती जन ह्रुदयामधुनी दाद
नाद मधुर मी परी जाणते, राधेला ही साद
कोण तुझी मी, थिरकून काहून करू मी मंजूळ गान 
ऐलतीरी मुरलीचा रुसवा, घनश्याम हैराण

तूच श्वास अन निश्वासही तू, यातच माझे जगणे
मम ह्रदयीच्या हुंकारातुन तुझेच उमटे गाणे
तुझ्याविना मी शवापरी, तुज जरा न राही भान
ऐलतीरी मुरलीचा रुसवा, घनश्याम हैराण