एकदा माझ्या मनातील गुपित तू ऐकून जा
एकदा माझ्या मनाच्या कुपीत डोकावून जा
एकदा श्वासातूनी तू ह्रुदयी मज घेऊन जा
बोलण्या आधीच अडले भाव मनीचे खोडले
उमलण्या आधी कळ्यांना का असे तू तोडले
तू तुझ्यातच मग्न परी मी भग्न हे जाणून जा
एकदा श्वासातूनी तू ह्रुदयी मज घेऊन जा
साद देण्या आज माझे सूर पडले तोकडे
रे उमाळे भावनांचे, हुंदके ही कोरडे
स्वप्न थिजले, गंध विझले, चेतना स्पर्शून जा
एकदा श्वासातूनी तू ह्रुदयी मज घेऊन जा
हे कलेवर घेऊनी फिरणे आता या भूवरी
अंतरीचा प्राण कधीचा सांडला हा बाहेरी
कोंडलेला श्वास कंठी मोकळा तू करून जा
एकदा श्वासातूनी तू ह्रुदयी मज घेऊन जा
पेटलेली आग विझूनी शांतले आता निखारे
राखही घेऊन गेले दशदिशांतील धुंद वारे
गीत माझे ऐकूनी घे अन खुशाल तू विरून जा
एकदा श्वासातूनी तू ह्रुदयी मज घेऊन जा
No comments:
Post a Comment