Monday, 14 December 2015

हिंदोळा



मिलनाच्या अधीर क्षणांचे .. सलणे अजून आहे
मोहरल्या मधुर खुणांचे .. छळणे रुजून आहे

उरात स्पंदनांचा स्वर मंद मंद वाहे
श्वासात समरसूनी तव गंध धुंद आहे
रसरसत्या अधरांवर खूण खुलून आहे
मोहरल्या मधुर खुणांचे .. छळणे रुजून आहे

मधाळ चुंबनांनी अशी चिंब चिंब गात्रे
स्मरताच स्पर्श अंगी चमकून वीज जाते
हिंदोळल्या मनाचा झोका झुलून वाहे
मोहरल्या मधुर खुणांचे .. छळणे रुजून आहे

शिणलेल्या काळजातून तो सुप्त सूर विरेना
तृप्तीत क्लांत तरीही तृष्णा मनी सरेना  
सळसळत्या भावनांचा शृंगार सजून आहे
मोहरल्या मधुर खुणांचे .. छळणे रुजून आहे




No comments: