Sunday, 16 April 2017

दाम करी काम

दामाजीचे गुलाम सारे माहित होते मला
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला

मीठ भाकरी मिळवून खाऊ
पांघरूनी नभ सुखात राहू
अशा तुझ्या त्या शब्दामधुनी झालो नादखुळा
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला

फुलपाखरू चुंबून वदले
तुझ्यात माझे विश्व वसले
मधु संपता गेले उडूनी शोधित नवीन फुला
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला

सत्ययुगी ते सत्य संपले
शब्दही कवडीमोल जाहले
विकले जाते एकजीव मन आज समजले मला
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला


No comments: