Sunday, 9 August 2015

दगड



मीच मला वेगळी ठरवून उभी राहते दगडावर
रुजत नाही अंकुर तिथे ठपका माझा नशीबावर

भोवताली हिरवळ .... सोबती खास गहिरे
नजर माझी अधू ... कान ठार बहिरे

अवघी सृष्टी कवेत घेऊन कोसळणारे आभाळ
अंधारल्या गुहेत मी ....माझीच करतेय आबाळ

ऐलतटी ती झुळूक येता .. पळते मी पैलतटी
ऐलतटावर पैलतटावर ... मुक्काम मुद्दाम वाळवंटी

कुणी येतं .. आणि नेतं गर्द रानी आग्रहानं
मी मात्र मुक्काम ठेवते दगडावरती निग्रहानं

हिरवळ आणा दगडावरती .. किती फोडला टाहो
वाट पाहते कधी कुणाला पाझर फुटतो का हो



No comments: