Saturday, 16 March 2019

झरा


त्रिभुवन फिरलो असा अलौकिक गुरु पाहिला नाही
निव्वळ तुझिया नजरेमधुनी झरा दुधाचा वाही

गतजन्मीचे पुण्य म्हणू की या जन्माची पुण्याई
जन्मदात्रीसम माया वर्षे गुरू म्हणावे की आई
उल्लंघूनी तुज प्रमाद केले कोटी कोटी गणना नाही
निव्वळ तुझिया नजरेमधुनी झरा दुधाचा वाही

कुठे तू असशी कुठे तू वसशी दूर दूर गुरूराया
मम ह्रदयीची हाक पोचते कशी तुझ्या रे ह्रदया
क्षणात येशी तू निजभेटी उभा ठाकुनी राही
निव्वळ तुझिया नजरेमधुनी झरा दुधाचा वाही

ह्रदयस्पंदने माझी असती, अहंकार हा मनी
ह्रदयस्पंदनी वसशी तूचि सत्य न उमगे जनी
सतत करोनी तुझी वंचना मद बाणवला जरी देही
निव्वळ तुझिया नजरेमधुनी झरा दुधाचा वाही

सर्व रिपूंचे वसतीस्थान मी असेच जग ओळखे
खलिफानाथे रूप बदलले मीच मला नोळखे
तू मी दोन्ही एक जाहले, एकही उरला नाही
निव्वळ तुझिया नजरेमधुनी झरा दुधाचा वाही

No comments: